अशोकराव भावके यांचे अपघाती दुःखद निधन
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
घोगावच्या माळरानावर ज्ञानाची मंदिरे उभारून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या मुलांना उच्च शिक्षणाची दालने सुरू करून कराड दक्षिण मध्ये शैक्षणीक क्रांती घडवणाऱे एक दिलदार समाजसेवक, युवा नेतृत्व अशोक जगन्नाथ भावके. वय वर्ष 53. जणू एक संघर्ष योद्धा यांचे आज पहाटे घोगाव ता.कराड येथे दुर्देवी अपघाती निधन झाले. कराड दक्षिण मधील एक युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने घोगाव व परिसरावर शोककळा पसरली आहे.
घोगाव तालुका कराड गावचे सुपुत्र श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे व मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोक भावके यांचे मंगळवारी मध्यरात्री अपघाती निधन झाले. कराड -चांदोली रोडवर घोगाव येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या समोरील मातोश्री हॉटेल मध्ये ते जेवणासाठी जात असताना शेडगेवाडी कडून वेगाने येणार्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते महामार्गाच्या बाजूला असणार्या नाल्यात कोसळले. जवळच असणाऱ्या त्यांच्या मातोश्री हॉटेलमधील कार्यकर्त्यांनी तो प्रसंग पाहिला व त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना कारने कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. तज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले मात्र दुर्देवाने त्यांना अपयश आले व आज पहाटे त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण कराड दक्षिणवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय, शिक्षण व सहकार क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची मोठी कन्या ऑस्ट्रेलिया येथे नोकरीनिमित्त असल्याने उद्या गुरुवारी रात्री कराड येथे पोहोचणार असल्याने शुक्रवार दिनांक 18| 02| 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता घोगाव येथील त्यांच्या जन्मगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अशोक भावके यांचा 27 ऑगस्ट1968 रोजी घोगाव येथे जन्म झाला. सर्वसामान्य कुटुंबात, अल्पशिक्षित आई-वडील, मात्र धार्मिक व संस्कारक्षम आई-वडिलांनी त्यांना चांगले संस्कार देऊन पदवीपर्यंतचे शिक्षण दिले . घरची सर्वसामान्य परिस्थिती यातून अशोक भावके यांनी संघर्ष करत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत पदवी संपादन केली. अनेक संकटे आली त्यावर सामोरे जाऊन संघर्ष करत जीवनाची वाटचाल केली. संकटांना कधीही डगमगले नाहीत. महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्याची व राजकारणाची आवड असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पगडा असल्याने त्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेतला व कराड दक्षिण मध्ये शिवसेनेचा झंझावात सुरू केला. पुढे राजकीय पटलावर कार्य करत शिवसेना पक्षाने त्यांच्यावर शिवसेना कराड दक्षिण तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. सतत लोकांच्यामध्ये कार्यरत राहून कराड दक्षिण मध्ये शिवसेना रुजवण्याची, संघटना वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. यानंतरच्या काळात कराड येथील कृष्णा हॉस्पिटल समोर झुणका-भाकर केंद्र सुरू केले. सर्वसामान्य लोकांना उद्योगासाठी कर्ज मिळावे यासाठी मातोश्री सहकारी पतसंस्थेची स्थापना केली व त्यातून अनेक बेरोजगारांना काम दिले. राजकीय क्षेत्रात काम करत असताना भावके यांना पक्षाने सन 1995 ला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. त्यावेळी प्रस्थापितांच्या विरोधात कुणीही निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवत नसे अशा काळात पक्षाने आदेश दिल्यानंतर निवडणूक लढवली. तिथून त्यांच्या राजकीय पर्वाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. घोगाव परिसरातील अनेक युवकांना त्यांनी मदत केली व या समाजकार्याच्या माध्यमातून ते खऱ्या अर्थाने युवकांचे प्रेरणास्थान बनले. कराड दक्षिण मधील शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे अशी त्यांची धारणा होती त्यांचा ध्यास होता. या साठी त्यांनी सन 1996 रोजी भविष्यात या कराड दक्षिण विभागासाठी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी श्री संतकृपा शिक्षण संस्थेची स्थापना केली. सलग सात वर्ष राजकीय, सामाजिक संघर्ष करत शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन ग्रामीण भागात स्वतःच्या गावात सन 2004 साली बी. फार्मसी या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना अहोरात्र परिश्रम घेऊन बी. फार्मसी हे महाविद्यालय सुरू केले. डोंगरदऱ्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी एक शैक्षणिक दालन सुरू झाले. कराड दक्षिण मधील सर्व जनतेने त्यांचे कौतुक केले. पाठीवर शाबासकीची थाप दिली.या महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठात पुढे नावलौकिक प्राप्त केला. त्यानंतर भावके साहेबांनी मागे वळून न पाहता शिक्षण क्षेत्रात आगेकूच केली. अनेक नवीन शैक्षणिक दालने सुरू केली यामध्ये डी फार्मसी, डी एड, बीएड, एम एड, डिप्लोमा इंजिनीअरिंग, निवासी स्कूल अशी शैक्षणिक दालने उभी केली 'केजी टू पीजी' हे त्यांचे स्वप्न त्यांनी अहोरात्र कष्ट करून पूर्णत्वास नेले. घोगाव येथील या माळरानावर ज्ञानाची संजीवनी व ज्ञान मंदिर उभे केले. या गावाचे नाव देशाच्या नकाशावर अधोरेखित केले. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या एका सामान्य युवकाने प्रतिकूल परिस्थितीत खूप मोठे शैक्षणिक कार्य उभे केले हे पाहून येथील जनतेने त्यांचे कौतुक केले त्यांचा गौरव केला. पुढे मातोश्री उद्योगसमूहा मार्फत बांधकाम क्षेत्रातही त्यांनी पदार्पण केले. घोगाव मधील अनेक गरजूंना त्यांनी मदतीचा हात पुढे केला. शैक्षणिक, सहकार क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून युवकांच्या हाताला काम देऊन स्वावलंबी बनवले हे सर्वसामान्य युवकांचे असामान्य कर्तृत्व होते. त्यांच्या कर्तुत्वाला सलाम. आज त्यांचे अपघाती दुःखद निधन झाले त्यामुळे घोगाव व परिसरातील गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आकस्मित जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात कार्य करून एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या व मैत्री पर्व जपणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वास शब्द फुलांची भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली.
__________________________________
सहकार, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे घोगाव गावचे सुपुत्र अशोक भावके यांचा अंत्यसंस्कार विधी शुक्रवार दिनांक 18|02| 2022 रोजी सकाळी 10 वाजता घोगाव या त्यांच्या जन्मगावी होणार आहे.
__________________________________