गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा 15 फेब्रुवारी रोजी पाटण येथे जनता दरबार.

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, समस्या जागेवर सोडविण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दि.15 फेब्रुवारी,2022 सकाळी 11.30 वा.पाटण येथील तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.कोविड संसर्गानंतर राज्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांचे अध्यक्षतेखाली पहिलाच जनता दरबार होत असून या जनता दरबारामध्ये ना.शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलसह जनतेच्या समस्या व विकास कामासंदर्भातील अडी-अडचणी जाणून घेणार आहेत.ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखालील जनता दरबारास जिल्हास्तरीय अधिकारी यांचेसह पाटण व कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांचे खातेप्रमुख यांनाही निमंत्रित केले आहे.मतदारसंघातील जनतेने आपल्या समस्यांची लेखी निवेदने घेऊन मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन ना.शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

        राज्याचे विद्यमान गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रथमत: पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार झालेनंतर सन २००४ ते २००९ व 2014 ते 2019 या कालावधीत पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्या तालुका व जिल्हास्तरावरील असणाऱ्या प्रलंबित समस्या व विकास कामांसंदर्भातील अडी-अडचणी या जागेवर सोडवून देणेकरीता सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेवून जनतेच्या जनता दरबार आयोजित करण्याची नविन संकल्पना राबविली होती.या जनता दरबारामध्ये मतदारसंघातील जनतेच्या अडी-अडचणींचा निपटारा जागेवरच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर होत होता.जनतेचे प्रश्न जागेवरच मार्गी लागत असल्यामुळे आम जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पहावयास मिळत होते व जनता दरबारास मतदारसंघातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसादही दिला होता. मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी ही संकल्पना सलग 10 वर्षे अखंडीत राबविली. पाटण मतदारसंघातील कराड तालुक्यातील सुपने मंडलकरीताही त्यांनी स्वतंत्र्य जनता दरबाराचे आयोजन करुन या विभागातील जनतेचे प्रश्न जागेवर मार्गी लावले होते.गत दोन वर्षामध्ये कोविड 19 चे संसर्गामुळे शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले नव्हते.

       आमदार शंभूराज देसाई हे राज्याचे नामदार झालेनंतर पहिल्यांदाच मंगळवार दि. 15 फेब्रुवारी,2022 रोजी आयोजित केलेल्या जनता दरबारास जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता तहसिल कार्यालय,पाटण च्या प्रांगणात आयोजित केलेल्या जनता दरबारास पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व व सुपने मंडलसह आम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून आप-आपले प्रलंबित प्रश्न,समस्या तसेच विकासकामांबाबतच्या अडचणींचा तातडीने निपटारा करुन घेणेसाठी आपल्या समस्यांची लेखी निवेदने या जनता दरबारामध्ये सादर करावीत,असे आवाहनही शेवटी पत्रकांत केले आहे.