शहरातील नागरिकांचे आरोग्य हेच नगरपालिकेचे प्राधान्य असले पाहिजे - पृथ्वीराज चव्हाण


माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास भेट दिली. 

 कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली व या प्रकल्पाची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून घेतली. यावेळी स्वच्छता दूतांचा सत्कार करण्यात आला तसेच या सर्वांशी आ. चव्हाण यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक श्रीकांत मुळे, राहुल चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, आमिर कटापुरे, झाकीर पठाण, भास्कर देवकर, विजय मुठेकर, अशोकराव पाटील आदीसह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

 यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, शहरासाठी कचरा व्यवस्थापन हि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. शहराच्या दृष्टीने चांगले आरोग्य राहावे यासाठी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट, शहरासाठी स्वच्छ २४ तास पिण्याचे पाणी, यासह सांडपाणी नदीला न सोडता त्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा उपयुक्त असा वापर करणे महत्वाचे आहे. शहराच्या महत्वाच्या बाबीसाठी याआधी सुद्धा मोठा निधी आणला होता आता सुद्धा आणला जाईल. 

कचरा व्यवस्थापन प्रकल्प अधिक यांत्रिकी पद्धतीने होण्यासाठी तसेच शहरातील महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुख्याधिकाऱ्यांनी प्रस्ताव सादर करावा त्यानुसार शासनस्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असेही यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 



------------------------------------------------------------------------