कर्नाटकमधील चोरटे पाटण पोलिसांच्या मदतीने ताब्यात ; पाटण पोलिसांची दमदार कामगिरी...!


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
कर्नाटकमधून चोरी करून पाटण तालुक्यातील नाटोशी येथे आश्रयाला थांबलेल्या तिघांना पाटण पोलिसांनी चतुराईने पकडून कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईमुळे पाटण पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सदर संशयितांचा पाटणसह परिसरातील चोरीशी काही संबंध आहे का याबाबतची चौकशी पाटण पोलिसांकडून सुरू आहे.

मोबाईल लोकेशनने काढला माग

तालुक्यातील नाटोशी येथील एक जण कर्नाटक येथे कामास आहे. तेथून आपल्या दोन साथीदारांसह तिघे जण काही दिवसांपूर्वी नाटोशी येथे वास्तव्यास आले होते. कर्नाटक पोलीस एका चोरीच्या प्रकरणात त्यांच्या मागावर होते. मोबाईल लोकेशननुसार ते तिघेही पाटण तालुक्यातील नाटोशी गावात असल्याचे समजल्यावर कर्नाटक पोलिसांनी पाटण पोलिसांशी संपर्क साधत पाटण पोलिसांच्या मदतीने सदर संशयित तिघांना रविवारी ताब्यात घेतले.

तिघेही मोठ्या गुन्ह्यात संशयित

सदर संशयित मोठ्या गुन्ह्यात कर्नाटक पोलिसांना हवे होते अशी माहिती मिळत आहे. त्या तिघांना पाटण पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या हाताचे व पायाचे ठसे घेऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली व तद्नंतर त्यांना कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान, सदर तिघांचा पाटणसह परिसरातील चोरीशी काही संबंध आहे का याबाबत पाटण पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पाटण पोलिसांकडून देण्यात आली.