काळगाव | डॉ. संदीप डाकवे
काळगांव पासून सुमारे 4 ते 5 किमी च्या अंतरावर धनगरवाडा ही वस्ती आहे. निसर्गरम्य वातावरणात इथे सुमारे 60 ते 70 घरांची वस्ती आहे. या ठिकाणी गावाला उजेड देणारे 6 पथदिवे आहेत. या पथदिव्यांचे खांब वीज आल्यापासून आजतागायत बदललेले नाहीत. त्यामुळे हे खांब पुर्णतः कुजून गेले आहेत, जीर्ण झाले आहेत. खांबाला असलेल्या तारांमुळे हे खांब उभे आहेत. ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. काही खांबाना संरक्षणासाठी येथील लोकांनी दगड रचले आहेत. परंतू हा तात्पुरता उपाय आहे. त्यामुळे तातडीने हे सर्व खांब बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. साहजिकच येथील लोकांच्याच्यावर मृत्यू घोंगावत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. तसेच सुमारे एक वर्षापासून या ठिकाणी पथदिवे नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य आढळून येत आहे.
या गावात अंतर्गत रस्ते, गटारे नाहीत त्यामुळे अनेक अडचणींचा सामना या लोकांना करावा लागत आहे. साधारणपणे 250 ते 300 लोकांची वस्ती या ठिकाणी आहे. 4 थी पर्यंत या ठिकाणी शाळा उपलब्ध आहे. पुढील शिक्षणासाठी मुलांना पाचगणी-गुढे या ठिकाणी किंवा काळगाव या ठिकाणी 5 ते 6 किमीची ये-जा करावी लागते. त्यानंतर मात्र येथील लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई-पुणे ची वाट धरतात.
आज रोजी या गावात 60 ते 70 वयोवृध्द लोक आहेत. आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाण्यासाठी या लोकांना खूप कसरत करावी लागते. सध्या शेतीची सर्व कामे झाली आहेत. त्यामुळे सर्वत्र राने रिकामी झाली आहेत. अशा काळात बिबटयाने वस्तीवरील जनावरांवर अनेकदा हल्ला केला आहे. रस्त्यावरील खांबावर वीज नसल्याने अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडता येत नाही. रस्त्यावरील पथदिवे बंद असलयाने या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सदरचे सर्व विजेचे पथदिव्यांचे खांब तातडीने बदलले नाहीत तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
____________________________________
लय हाल हुतया :
‘‘खांबावर लायट नसल्यानं रात्रीच्या टायमाला बाहेर जाताना लय हाल हुतया. त्यातच बिबटयानं पण लय तरास दिलाया, मागच्याच महिन्यात दारातनं बिबटयानं कुत्रं न्हेलं. 1 वरसापासनं दारात लायट न्हाय. अंधार पडला तर बाहीर जाताना अंगावर काटाच यतूया’’ अशी प्रतिक्रिया येथील वयोवृध्द महिलेने दिली आहे.
____________________________________