अण्णासाहेबांनी माथाडी कामगारांची युनियन युनियनसाठी न चालविता एक सामाजिक संघटना म्हणून तीचे स्थान निर्माण केले, हे अण्णासाहेबांच्या महान कार्यातून सिध्द होते. माथाडी कायद्याच्या निर्मित्तीसाठी त्यांनी संघर्ष केला, एक चळवळ तयार करणे व ती संघर्षातून पुढे घेऊन जाण्याचे तसेच माथाडी कायदा निर्माण करण्याचे महत्वाचे काम अण्णासाहेबांनी केले, अशा या नेत्याच्या ८८ व्या जयंती निमित्त मी त्यांना प्रणाम करतो असे भावपुर्ण उद्गार व प्रतिपादन केंद्रीय श्रम व पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी केले.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक स्व. आमंदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८८ व्या जयंती निमित्त माथाडी कामगार भवन, नवीमुंबई येथे आयोजित केलेल्या माथाडी कामगारांच्या ऑनलाईन मेळाव्यात केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव हे बोलत होते.या मेळाव्यात बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अण्णासाहेबांनी मराठा समाज व माथाडी कामगारांच्या जीवनाला दिशा दिली आणि त्यांचे जीवन उन्नत केले. गरीबीला, श्रमाला, बोजा उचलणा-या माथाडी कामगारांची चळवळ उभारुन त्यांना सन्मान मिळवून दिला. यावेळी युनियनचे सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात केंद्र व राज्य सरकारच्या आखत्यारीत असलेल्या विविध प्रश्नांची माहिती दिली व ते सोडविण्यासाठी उपस्थित मंत्री महोदय व मान्यवरांना आग्रह केला. या मेळाव्यात संघटनेचे नेते कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, माथाडी कायद्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी व तो कायदा देशपातळीवर गेला पाहिजे अशी मी यादवजी व त्यांच्या सरकारला विनंती करतो. तर इनकम टॅक्सच्या नवीन धोरणामुळे माथाडी मंडळे अडचणीत येणार असून, ही समस्या सोडविण्यासाठीही यादवजींनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक संघटनेचे संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख यांनी केले तर माथाडी कामगार नेते कार्याध्यक्ष, गुलाबराव जगताप यांनी आभार मानले.यावेळी माजी मंत्री व आमदार गणेश नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास माजी मंत्री राज पुरोहित, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार संदिप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, संजय उपाध्याय, माथाडी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, रविकांत पाटील, दिलीप खोंड खजिनदार गुंगा पाटील, कायदेशीर सल्लागार भारती पाटील, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश पाटील, माथाडी हॉस्पीटलचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील, बाजार समितीचे चेअरमन अशोक डक, व्यापारी प्रतिनिधी शंकरशेठ पिंगळे, संजय पानसरे, दिनेश विरा नगरसेविका शुंभागी पाटील, शशिकला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.