मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
मुंबईतील साकीनाका परिसरात घडलेल्या निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने ऍड.राजा ठाकरे यांना बदलून त्यांच्या जागी सरकारी वकील म्हणून ऍड.नितीन सातपुते यांची नियुक्ती करावी अशी मागणी करणारे पत्र चर्मकार विकास संघाच्यावतीने मुंबई अध्यक्ष सुभाष मराठे- निमगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
दरम्यान,ऍड.राजा ठाकरे यांचा डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील अनुभव लक्षात घेता पीडितेच्या आईनेही त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.
चर्मकार विकास संघाने केलेल्या मागणी पत्रानुसार, ऍड.नितीन सातपुते हे समाजातील सुप्रसिद्ध वकील असून त्यांनी महाराष्ट्रातील अनेक प्रकरणे मार्गी लावली आहेत.त्यामुळे हा खटला चालविण्यासाठी अट्रोसिटी ऍक्ट आणि संवेदनशील प्रकरणाचा अभ्यास असलेले समाज बांधव ऍड.नितीन सातपुते यांचीच विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी.तसेच निर्भयाचा खुनी मोहन चौहान याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी मागणीही चर्मकार विकास संघाच्यावतीने करण्यात आली आहे.