काळगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सलग तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील काळगाव विभागातील रस्ते, पूल उखडले, शेती वाहून गेली. सलग पडणार्या पावसाने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने लोकांना संपर्क साधणे अवघड झाले आहे.
याच विभागातील कुठरे खालील मोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. यामधे इलेक्ट्रिक पोल 11 KV पावसामुळे पडला असून विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. तसेच हणमंत काशिनाथ मोळावडे, शांताराम मोरे व आनंद मोरे यांची ऊसाची शेती पावसाने पूर्ण वाहून गेली आहे. तसेच सार्वजनिक विहिरी मध्ये पाणी गेल्याने लोकांची गैरसोय होत आहे. येथील शेतकऱ्यांचे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
येथील सर्व शेतकऱ्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे . मुसळधार पावसामुळे व पुरामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून शासनाने येथील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई ची मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. खंडित विज पुरवठा लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.