कोयना धरणात ४१.५५ टीएमसी पाणीसाठा
पाटण  | कृष्णाकाठ वृत्तसेवा  : कोयना धरणांतर्गत विभागात तुरळक पाऊस पडत असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण घटले आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद केवळ सरासरी ४४६९ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. मागील चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात केवळ ०.३१ टीएमसीने तर पाणी उंचीत ६ इंचाची वाढ झाली आहे. धरणात सध्या एकूण ४१.५५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

गुरूवारी कोयना धरणांतर्गत विभागासह तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी पावसाने उघडीप दिली. धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी सर्वच विभागात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. धरणात सध्या सरासरी प्रतिसेकंद ४ हजार ४६९ क्युसेक्स इतकीच पाण्याची आवक होत आहे. धरणाची सध्याची स्थिती पाहता एकूण पाणीसाठा ४१.५५ टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ३६.५५ टीएमसीआहे. पाणीउंची २०९६.६ फुट, जलपातळी ६३९.१ मीटर इतकी झाली आहे. कोयना धरण पायथा वीजगृहातून दोन जनित्राद्वारे ४० मेगावॉट वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २ हजार व१०० क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. बुधवारी संध्याकाळी पाच ते गुरुवारी संध्याकाळी पाच या चोवीस तासातील व एक जूनपासून आजपर्यंत झालेला एकूण पाऊस कंसात पुढीलप्रमाणे कोयना २३ मिलिमीटर (८६५), नवजा २९ मिलिमीटर, (९७२), महाबळेश्वर ४२ मिलिमीटर (११२१) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.