कृषि सहाय्यकांना विमा संरक्षण द्या : खा.श्रीनिवास पाटील

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

    यावर्षीचा खरिप हंगाम सुरू होणार असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतक-यांच्या बांधावर जाऊन काम करणा-या कृषि कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे व कृषिमंत्री ना.दादा भुसे यांना पत्र लिहून याबाबतची मागणी केली आहे.

    आपल्या पत्रात खा. श्रीनिवास पाटील यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी केल्याबद्दल राज्य सरकारचे आणि मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. खा.पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, यावर्षीच्या खरीप हंगामाच्या अनुशंगाने कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी ग्राम पातळीवर काम करत आहेत. कामाच्या स्वरूपामुळे त्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर कामे करावे लागत आहेत. गावपातळीवर प्रामुख्याने कृषि सहाय्यक कामे करत असून खरीप हंगाम यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सदरचे काम करत असताना त्यांना कोणतेही विमा संरक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्याच्या कोरोना काळात आरोग्याच्या दृष्टीने अनुचित घटना घडल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण देण्यात आले नसल्याचे महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे. संघटनेच्या पदाधिका-यांनी खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन त्यासंदर्भातील विनंती केली होती.

   खरीप हंगामासाठी कृषि कर्मचा-यांचे महत्वपूर्ण कार्य असून त्यांचा थेट संपर्क गावगावच्या शेतक-यांपर्यत येतो. सद्य परिस्थितीत त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना विमा कवच मिळणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण पातळीवर काम करणा-या इतर खात्यातील अधिकारी व कर्मचा-यांना विमा कवच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार कृषि सहाय्यक संघटनेच्या कर्मचारी वर्गाला देखील विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.