श्री संतकृपा शिक्षण संस्थेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 


उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या प्रांगणात 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री संतकृपा इंजिनिअरिंग (बी टेक) चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले आपल्या देशाचे संविधान तयार करणारे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन तसेच आपला देश स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात वाहून घेणारे नेते, स्वातंत्र्यसैनिक यांना सलाम त्यांच्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात आनंदाने राहत आहे.

कोरोनाच्या महामारीत आपले व आपल्या देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्याच प्रमाणे कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवले चांगल्या सवयी नियम लावले. अजूनही आपण सर्वांनी आपल्या व आपल्या कुटुंबाची आरोग्याची काळजी घेणे अतिशय काळाची गरज आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणारे सर्व कोरोना योद्ध्यांचे मी कौतुक व अभिनंदन करत आहे.

त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनात धन्यवाद व क्षमा या शब्दांचे खूप मोठे महत्त्व आहे. या दोन शब्दामुळे आपल्या जीवनात आनंद मिळेल. या शब्दांचा आपण जीवनातील प्रत्येक क्षणाला उपयोग करून घ्या व आपले दैनंदिन जीवन सुखकर करा असा संदेश ही त्यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिला.

यावेळी श्री संतकृपा शिक्षण संस्थेतील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सुनीता सुतार यांनी मानले.