पोलिसांत गुन्हा दाखल...!
मुंबई |कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या मंत्रालयातील एका महत्त्वाच्या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी केली असता या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर त्याच्यावरती असणाऱ्या मजकुरात कोणीतरी फेरफार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या सगळ्याचा छडा लावण्यासाठी मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश काढले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र,त्यानंतर या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या वरच्या भागात लाल पेनाने एक अतिरिक्त मजकूर लिहण्यात आला होता. त्यामध्ये संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी, असे म्हटले होते. साहजिकच हा प्रकार उघड झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली.
शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधील बांधकामातील अनियमिततेच्या कारणावरून सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक अभियंत्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये फेरफार करण्यात आलेल्या फाईलमधील अधीक्षक अभियंता नाना पवार यांचाही समावेश होता. नाना पवार हे त्यावेळी कार्यकारी अभियंता होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चौकशीची ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. मुख्यमंत्र्यांकडून सही होऊन या फाईल्स सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परत आल्या. तेव्हा अशोक चव्हाण यांना या फाईल्स पाहून धक्काच बसला. मुख्यमंत्र्यांनी अन्य अभियंत्यांच्या चौकशीला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, त्यामधून नाना पवार यांचे नाव वगळले होते. अशोक चव्हाण यांना फाईलवरील शेऱ्याबद्दल संशय वाटला. मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या अत्यंत छोट्या जागेत हा शेरा कसाबसा लिहला होता. एरवी मुख्यमंत्री सही करताना मजकुर आणि सहीमध्ये पुरेशी जागा सोडलेली असते.त्यामुळे अशोक चव्हाण यांनी ही फाईल पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या फाईल्सच्या स्कॅन करून ठेवल्या जातात. त्या कॉपीज तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरच्या भागात असा कोणताही शेरा लिहला नसल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांनी नाना पवार यांच्या चौकशीसाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे संबंधित फाईलमध्ये कोणीतरी परस्पर फेरफार केल्याचे उघडकीस आले.