महिलांना कौटुंबिक हिंसाचारा पासून मुक्ती मिळावी व महिलांना या कायद्याबाबत माहिती व्हावी यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान यांच्यावतीने महिलांमध्ये जनजागृती सुरू आहे.
सातारा / प्रतिनिधी
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे नेहमीच सातत्याने महिलांचे प्रश्न, अडीअडचणी, माहवारी(मासिक पाळी)- शाप की वरदान, सॅनिटरी नॅपकिन बद्दल माहिती पुरवणे तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा याबद्दल महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम करत आहे. यासाठी शाळा, कॉलेज त्याचबरोबर महिला बचत गट यांच्यासाठी प्रतिष्ठाणच्या वतीने वेळोवेळी शिबिरांचे आयोजन करण्यात येते.
महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून सुरक्षितता देणे, त्यांना घरात सुरक्षितता लाभावी व त्यांना बेघर केले जाऊ नये तसेच महिलांच्या अधिकारांची कडक अंमलबजावणी व्हावी ही काही महत्वाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्रतिष्ठान हे काम करत आहे.
पीडित महिला या आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्थानकात जात असतात अशा समस्त महिलांना मदतीचा हात देणेकामी, समोपदेशन करण्यासाठी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान सदैव सेवेची ठायी तत्पर आहोत हे मा.सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि पोलिस उपअधीक्षक वाई उपविभाग मा.अजित टिके यांची भेट घेऊन एक पत्र देऊन विनंती केली. मा.तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या सहकार्याने जिल्ह्यामधील प्रत्येक पोलीस स्टेशन ला हे निवेदन देऊन प्रत्येक पीडीत महीलेपर्यंत पोहचण्याचा मानस प्रतिष्ठानचा असेल. सातपुते मॅडम यांनीही प्रतिष्ठानच्या वतीने हे सुरू असलेल्या कामाबद्दल कौतुक केले.
प्रत्येक माणसाच्या तोंडांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असते मात्र शिवविचार खरच आपल्या रोजच्या जीवनात आपण अंमलात आणतो का हा प्रश्नच आहे. स्त्रियांचा आदर करण्याचा संस्कारच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला असून त्याची आठवण सर्वांनी ठेवली पाहिजे. महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा पीडित महिलांना या हिंसाचाराविरोधात लढणे कामी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान वेळोवेळी मदत करीत आहेत व करीत राहीलच. समाजात तळागाळात जाऊन काम करीत असताना बहुतांश महिला "कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ नियम २००६" या कायद्याबद्दल अनभिज्ञ असल्याचे आढळून येतेय. सदर संरक्षण कायद्याची परिपूर्ण माहिती देणेकामी प्रतिष्ठानने आजवर अनेक शिबिरांचे आयोजन ही केलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा ते करणार आहोत अशी माहिती अध्यक्षा अश्विनी महांगडे यांनी दिली.
महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे सदस्य हे पत्र त्यांच्या जवळच्या पोलीस स्थानकात देत आहेत. महिलांना प्रतिष्ठान च्या वतीने करत असलेल्या या उपक्रमाचा फायदा होईल अशी अशा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केली.