कराड दि.०३ :
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना अधिक बळ मिळावं यासाठी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील हे गेले ३-४ दिवस सुमारे ५०० हून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधत आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक करीत त्यांना प्रोत्साहन देत आहेत
राज्यातील पोलीस दल आपल्या सर्व अडचणी दूर ठेवून आपल्यासाठी फिल्डवर तैनात आहेत. मानवतेवर ओढावलेल्या या संकटाचा मुकाबला करण्यासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, किंबहुना याला आपले प्राधान्य असले पाहिजे अशी माझी भूमिका आहे. यामुळेच पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असताना त्यांना प्रत्यक्षात फिल्डवर काम करताना येणाऱ्या अडीअडचणी समजावून घेतल्या. त्यांना हे काम करताना नेमकं काय हवंय हे जाणून घेतले. यानुसार त्यांना मास्क व सॅनिटायजर या आवश्यक गोष्टी पुरविण्याचे ठरविले. यानुसार श्रीनिवास पाटील चॅरीटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी सॅनिटायजर्सचे पाच लीटरचे १० कॅन व अडीच हजार मास्क पुरविण्याचे नियोजन केले. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे आज ही मदत सुपूर्द करण्यात आली. आपल्या साताऱ्याचे पोलीस दल यामुळे अधिक सजगतेने कोरोनाचा सामना करु शकेल. माझी सर्वांनी विनंती आहे की, तुम्ही देखील कोरोनाच्या विरोधातील लढाईत सक्रीय सहभागी व्हा. यासाठी घरातच थांबा व विषाणूचा प्रसार रोखा. लक्षात ठेवा, पोलीस आपल्यासाठीच तैनात आहेत. त्यांना सहकार्य करा. असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले आहे.