पाेलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही - ना. शंभूराज देसाई


सातारा : लॉकडाऊनच्या सध्याच्या परिस्थितीत पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. 14- 14 तास पोलिस ऑनड्युटी रस्त्यावर उभे आहेत. जनतेची सुरक्षा व आरोग्यासाठी कष्ट घेणाऱ्या या मंडळींना विनाकारण त्रास देऊन त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कुणी केल्यास तो खपवून घेणार नाही. असा इशारा गृह व उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.


मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतीच ग्रामीण रुग्णालयासह विभागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजनांची माहिती घेतली. रुग्णांची काळजी घेताना स्वतःच्याही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या वेळी दिला. तसेच जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. विविध आरोग्य केंद्रे व सरकारी रुग्णालयांना पूर्व कल्पना न देता भेट देऊन तेथील उपचार सुविधांची माहिती घेतली आहे.
         त्याचप्रमाणे, लॉकडाउनमध्ये परवाना प्राप्त दारू दुकाने सील केलेली असतानाही चोरट्या मार्गाने होणारी दारूची विक्री ही गंभीर बाब असून, त्यावर कडक कारवाईचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केलेल्या असतानाही नजर चुकवून मुंबई-पुणे व अन्य शहरातून लोक गावी येत आहेत. त्यांच्यासह इतरांच्याही आरोग्यासाठी ही गंभीर बाब असून, अशा प्रकारांबाबत कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.