कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पलूस येथील अभिनव उपक्रम : "आपले आरोग्य आपल्या हाती"



 कोरोनाच्या संकटात मानसिक धैर्य वाढविण्यासाठी पलूस परिसरात जनजागृती करताना प्रा.डॉ. संपतराव पार्लेकर व इतर.


पलूस - जगभरात कोरोना या रोगाचा धुमाकूळ सुरु असताना सामान्य माणसांच्या मनात त्याची अनामिक भिती गडद होत आहे. अशावेळी यासंकटाला सामोरे जात असताना नागरीकांचे मनोधैर्य वाढावे, लोकांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि सुरक्षिततेची भावना वाढीस लागावी म्हणून पलूस येथील प्रा. डॉ. संपतराव पार्लेकर आणि आर. एस. पीचे समुपदेशक दिनकर खोत या शिक्षकांनी 'आपले आरोग्य आपल्या हाती' हा उपक्रम हाती घेतला आहे. तहसिलदार राजेंद्र पोळ यांच्या सहकार्याने गावोगावी जाऊन लोकांच्या मनातील गैरसमज दूर होण्यासाठी माईकवरु संदेश देणे सुरु आहे. कोरोनाला पळवून लावण्यासाठी वस्तुस्थिती मांडली जात आहे. यामध्ये प्रा. सचिन जाधव, आर. एस. पी. शिक्षक बी. बी. पांढरे, जयवंत मोहिते, विशेष पोलिस अधिकारी सुशांत असवले, व्यापारी विजय शहा, वृत्तपत्र विक्रेते यशवंत कदम व उमेश गोंदील सहभागी आहेत.  यासाठी साऊंड विनायक गोंदील यांनी उपलब्ध करुन दिला आहे.
     यावेळी डॉ. संपतराव पार्लेकर यांनी सांगितले की, पलूस तालुक्यातील सांडगेवाडी,रामानंदनगर, आंधळी, मोराळे, पलूस मधील कोयना वसाहत, पलूस कॉलणी, बुर्ली,आमणापूर, विठ्ठलवाडी, संतगाव व खोलेवाडी या गावातील बेघर वसाहती, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी नागरीकांना सुरक्षिततेचे संदेश दिले जात आहेत. घरी रहाल तर सुरक्षित रहाल, गरजेपुरची वहाणे वापरा, इतरापासून दूर रहा, लहान मुले व वयस्क व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष दया, पोलिसांना सहकार्य करा, कुटुंबातल्या जबाबदार व्यक्तीने घरातल्या सर्वांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे, काही दिवस नातेवाइकांशी संपर्क टाळावा,  तोंडाला मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा, त्यांच्या सुचनांचे पालन करा. या कोरोना संकटाला हरविणे ही आपली फार मोठी जबाबदारी आहे.घाबरून न जाता स्वताची काळजी घ्या आणि पुढच्या चांगल्या परिस्थितीसाठी धीर धरा या आशयाचे संदेश दिले जात आहेत. यावेळी नागरिकांच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
     या जनजागृती कार्यक्रमास रामानंदनगर येथे पलूस पोलिस स्टेशनचे एपीआय अझहर शेख यांनी भेट दिली. अनेक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सहकार्य मिळाले.