“उद्धव ठाकरेजी लोक गंभीर नाहीत, लॉकडाउनने भागेल असे वाटत नाही; संचारबंदी लागू करा”


करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्रातील नागरी भागात १४४ कलम लागू करत असल्याचं जाहीर केलं होतं. लोकांना गरजेशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय लोकलसेवाही बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.


जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव आपल्याला आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. लोक ऐकत नसल्याने संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.


जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “परिस्थिती गंभीर आहे. करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८९ झाली आहे. लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. मी स्वतः फिरून हा अनूभव घेतला. लोक ऐकत नाहीत. उद्धव ठाकरेजी संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे. परिस्थितीचा विचार करता…अभी नही तो कभी नही”.