मुंबई: देशातील कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारला मदत करायचे ठरवले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांचे एका महिन्याचे वेतन सरकारच्या तिजोरीत जमा केले जाणार आहे. शरद पवार यांनी गुरुवारी संध्याकाळी ट्विट करून ही माहिती दिली. त्यानुसार, महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमदार आपले वेतन 'मुख्यमंत्री सहायता निधी' तर संसदेतील राष्ट्रवादीचे खासदार आपला एका महिन्याचा पगार 'पंतप्रधान सहायता निधी'साठी देतील. त्यासाठी सर्वांनी आपले धनादेश जयंत पाटील यांच्याकडे जमा करावेत, असा आदेश शरद पवार यांनी दिला.
या अभूतपूर्व संकटात राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसोबत ठाम उभी आहे. आमची सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही वेतन दान करण्याचा निर्णय घेतल्याचेही पवारांनी सांगितले. तत्पूर्वी केंद्र सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ लाख ७० हजार कोटीचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले. या माध्यमातून केंद्र सरकारने शेतकरी, बांधकाम मजूर, रोजंदारीवर काम करणारे मजूर, महिला, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, आज दिवसभरात महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १२५ वर जाऊन पोहोचला. आज दिवसभरात राज्यात तीन नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.