पुण्यातील हडपसर भागासह अनेक ठिकाणी ‘हॅप्पी अॅनिव्हर्सरी, सॉरी आप्पू’ असं लिहिलेले पोस्टर बघायला मिळत आहेत. आपल्या नाराज झालेल्या पत्नीला मनवण्यासाठी एका डॉक्टरने हे फ्लेक्स लावल्याची चर्चा सुरु आहे. दोघेही पती-पत्नी डॉक्टर असून त्यांचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात सुरु आहे.
गुरुवारी (13 फेब्रुवारी) सकाळपासूनच सोशल मीडियावर पुण्यातील रस्त्यांवर लागलेले “सविताभाभी, तू इथंच थांब….” असा मजकूर असणारे पोस्टर व्हायरल होत होते. आज पुन्हा वेगळ्या प्रकारे आपल्या पत्नीला मनवण्यासाठी आणि घटस्फोट रोखण्यासाठी म्हणून पोस्टरबाजी झाली आहे. ही पोस्टरबाजी उच्चशिक्षित पतीने पत्नीचं मन वळवण्यासाठी केली. यासाठी त्याने जाहिरपणे ‘सॉरी आप्पू, हॅपी अॅनिव्हर्सरी, आय लव्ह यू’ म्हणत माफी मागितली.
पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमी असलेल्या या पोस्टरवर इतर काहीही लिहिलेले नाही. त्यामुळे हे पोस्टर कोणी आणि का लावले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वी पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात ‘शिवडे, आय एम सॉरी’ या पोस्टरची चर्चा झाली होती. पिंपरीतील ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा असा मजकूर असलेली पोस्टर व्हायरल झाली होती. त्यावेळी संबंधित फ्लेक्स लावणाऱ्या दुकानदाराने टीका झाल्यावर माफीही मागितली होती. हा देखील अशाच प्रसिद्धीचा प्रकार असू शकतो, असं मत काहीजण व्यक्त करत आहेत. मात्र सध्या या फ्लेक्सवरून सोशल मीडियात मात्र भन्नाट चर्चांना उधाण आलं आहे.