मलकापूर जवळ तिहेरी अपघातात १ ठार ५ गंभीर जखमी


कराड/प्रतिनिधी
          मलकापूर येथे आशियाई महामार्गावर तिहेरी अपघात झाला. शुक्रवारी 31 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात एक महिला ठार तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
         शिल्पा मनोहर भगत (वय 62) रा. लालबाग मुंबई असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर हर्षद मनोहर भगत (वय 40), मनोहर आत्माराम भगत (वय 60), मिताली अनंत सपकाळ (वय 32) तिघेही रा. लालबाग मुंबई, कारचालक सतिश साहेबराव भोईटे (वय 45), पिकअप चालक महेश आनंदा गायकवाड (वय 28) रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. 
          याबाबत घटनास्ळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लालबाग मुंबई येथील राहणारे भगत कुटुंबिय ब्रिझा कारने (एम.एच.01 सी.टी 3939) मुंबईहून कोल्हापूरकडे निघाले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आशियाई महामार्गावर मलकापूरच्या हद्दीत कारचालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे त्यांच्या कारने दुभाजक तोडून कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या पिकअप टेम्पोंला (एम.एच.45 टी 4096) धडक दिली. 
          दरम्यान, हा अपघात चुकवण्याच्या प्रयत्नात मिनी टेम्पो (एम.एच.09 सी.यु 1953) पलटी झाला. या तिहेरी अपघातात कारमधील शिल्पा भगत ह्या जागीच ठार झाल्या. तर हर्षद भगत, मनोहर भगत, मिताली सपकाळ, कारचालक सतिश भोईटे, पिकअप चालक महेश गायकवाड  असे पाचजण या अपघातात गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी कराड येथील रूग्णालयात हलवण्यात आले. 
          सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तत्पूर्वी घटनास्थळी पोलीसांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी क्रेन बोलावून महामार्गावरील तिन्ही वाहने बाजूला करून वाहतुक सुरळित केली. या अपघातात अपघातग्रस्त वाहनांचे नुकसान झाले. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.