ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक
कृष्णा उद्योग समूह व अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने अंगणवाडी सेविकांना 1000 मास्कचे वितरण .
March 31, 2020 • चंद्रकांत चव्हाण

 


कराड/प्रतिनिधी : 
          कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावातही ग्रामीण आरोग्यासाठी कार्यरत असणार्‍या अंगणवाडी ताईंच्या सुरक्षेसाठी कृष्णा उद्योग समूह व अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्यावतीने 1000 मास्क पुरविण्यात आले आहेत. कराड पंचायत समितीचे महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी विशाल कोतागडे यांच्याकडे हे मास्क सुपूर्द करण्यात आले असून, त्यांच्या कार्यालयामार्फत गावागावात कार्यरत असणार्‍या अंगणवाडी ताईंना या मास्कचे वितरण केले जाणार आहे.
           कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावपातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कर्मचारी कार्यरत आहेत. या सेविका गावातील घराघरांत जाऊन सर्व्हेक्षण करत असून, परदेशातून तसेच दिल्ली, मुंबई, पुणे या भागातून गावी आलेल्या लोकांच्या प्रत्यक्ष नोंदी करत आहेत. तसेच या व्यक्तींना दररोज भेटून त्यांना सर्दी, ताप, खोकला यासह अन्य काही लक्षणे आढळतायत का, याचीही विचारपूस करावी लागत आहे. इतकी गंभीर स्वरूपाची जोखीम पत्करणार्‍या या अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मात्र पुरेशा प्रमाणात मास्क पुरविण्यात न आल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे.
            या पार्श्‍वभूमीवर कृष्णा उद्योग समूह व अतुल भोसले युवा प्रतिष्ठानने या सेविकांसाठी 1000 मास्क उपलब्ध करून दिले आहेत. निवास मोहिते, सचिन शिंदे व सुधाकर कापूरकर यांच्यामार्फत कराड पंचायत समितीचे महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी विशाल कोतागडे यांच्याकडे हे मास्क सूपूर्द करण्यात आले. लवकरच हे मास्क गावागावात कार्यरत असणार्‍या अंगणवाडी ताईंना वितरित करणार असल्याची माहिती श्री. कोतागडे यांनी यावेळी दिली. कृष्णा उद्योग समूह व अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे .